पैशांच्या वादातून चिपळूणमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; जळालेल्या सांगाड्यावरून २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा

Spread the love

पैशांच्या वादातून चिपळूणमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; जळालेल्या सांगाड्यावरून २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा

पोलीस महानगर नेटवर्क

चिपळूण : पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रामपूर शिवार परिसरात उघडकीस आली आहे. आंबा बागेजवळील झाडाझुडपांत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मानवी अवशेष आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, चिपळूण पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली.

या प्रकरणात विशाल विजय खोडदेकर (२८, रा. रामपूर, ता. चिपळूण) आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार पैशांच्या वादातून घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

रामपूर शिवारातील दरीत संशयास्पद स्थितीत जळालेला सांगाडा, हाडांचे तुकडे, अंगठी आणि स्टीलचा रॉड आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे जप्त केले. कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे अवशेष मानवी असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान संबंधित जागा आरोपी विशाल खोडदेकर याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. तो फरार असल्याने संशय अधिकच गडद झाला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ३१ मार्च रोजी रात्री विशालला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत जन्नतुनिसा खान हिचाही सहभाग उघड केला. त्यानंतर १ एप्रिल रोजी तिलाही अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon