डोंबिवलीत ‘रिल स्टार’कडून हत्यारांचा साठा जप्त; १५ दिवसांतच पुन्हा अटक
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : अत्याचाराच्या आरोपातून अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सुटका झालेल्या सोशल मीडिया ‘रिल स्टार’ सुरेंद्र पाटील याच्या घरावर छापा टाकत पोलिसांनी मोठा हत्यारसाठा जप्त केला. दावडी परिसरातील त्याच्या निवासस्थानी केलेल्या या कारवाईत ७ पिस्तुले, ३७१ जिवंत काडतुसे, तलवारी आणि चॉपर असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याण गुन्हे शाखा पथकाने रविवारी पहाटे छापा टाकत ही कारवाई केली. विशेष म्हणजे, ही हत्यारे घरातील चपलांच्या स्टँडमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पाटील याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या पथकाने केले. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा नेमका कुठून आणला आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पाटील हा नाशिकमधील अशोक खरात याच्याप्रमाणे अनेक महिलांशी संबंध ठेवत असल्याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत पाटीलविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल असून त्यात आर्म अॅक्टसह इतर कलमांचा समावेश आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर तडीपारची कारवाईही करण्यात आली होती. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त रिल्स तयार करणे, तसेच पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून व्हिडिओ बनवणे, अशा प्रकारांमुळे तो पूर्वीही चर्चेत आला होता.
इन्स्टाग्रामद्वारे मैत्री करून दोन तरुणींवर अत्याचार केल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच त्याची सुटका झाली होती. मात्र, पुन्हा शस्त्रसाठ्यासह अटक झाल्याने प्रकरण गंभीर बनले आहे. या ‘रिल स्टार’चे सोशल मीडिया खाते बंद करण्याची मागणीही आता जोर धरू लागली असून पुढील तपासात आणखी काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.