अजित पवार अपघात प्रकरणात घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही; रोहित पवारांना फडणवीसांचे आश्वासन

Spread the love

अजित पवार अपघात प्रकरणात घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही; रोहित पवारांना फडणवीसांचे आश्वासन

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर सविस्तर निवेदन करताना, या प्रकरणात घातपाताचा कोणताही पुरावा आढळल्यास संबंधितांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देताना त्यांनी सखोल तपासाची ग्वाही दिली.

फडणवीस म्हणाले, अपघात प्रकरणात आतापर्यंत विविध पातळ्यांवर तपास सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार पुढील कारवाई केली जात आहे. “तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका. या प्रकरणात कुणीही दोषी आढळल्यास त्याला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.

झिरो एफआयआरच्या मुद्द्यावरून त्यांनी कर्नाटकातील कारवाईवर आक्षेप घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, कर्नाटकात दाखल झालेला झिरो एफआयआर नियमांच्या चौकटीत बसत नाही. “झिरो एफआयआरचा वापर विशिष्ट परिस्थितीतच होतो. या प्रकरणात त्याचा वापर अयोग्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, कायदेशीर प्रक्रियेचे पालन आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, अपघाताच्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला ‘एडीआर’ नोंदवला जातो आणि तपासानंतरच तो एफआयआरमध्ये रूपांतरित होतो. “क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये नियमांनुसारच काम करावे लागते,” असे ते म्हणाले.

या प्रकरणात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सत्य बाहेर आणण्याचा निर्धार व्यक्त करत फडणवीस म्हणाले, “अजित दादा हे केवळ रोहित पवारांचे नातेवाईक नव्हते, तर आमचेही जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या अपघाताच्या तपासात कोणतीही तडजोड होणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon