निरोपाच्या क्षणी सौम्य सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शिवसेनेतील फूटीनंतर परस्परांवर टीकेची धार कायम ठेवणारे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधान परिषदेतील निरोप समारंभाच्या निमित्ताने अनपेक्षित सौम्यता पाहायला मिळाली. विधान परिषदेतील आपल्या शेवटच्या अधिवेशनानिमित्त निरोप घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी प्रथमच ‘साहेब’ असा उल्लेख करत निरोगी दीर्घायुष्य आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विधान परिषदेतील नऊ सदस्यांच्या निवृत्तीप्रसंगी आयोजित निरोपाच्या भाषणात शिंदे यांनी सर्व सदस्यांच्या कार्याचा गौरव केला. मात्र, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख होताच सभागृहाचे विशेष लक्ष त्यांच्या वक्तव्याकडे वेधले गेले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा.”
राजकीय पातळीवर तीव्र मतभेद असतानाही निरोपाच्या क्षणी व्यक्त झालेल्या या सद्भावनापूर्ण भूमिकेमुळे सभागृहात क्षणिक सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.