पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध विदेशी दारूचा साठा जप्त; तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : शहरात अवैध मद्यविक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून दिघी परिसरात टाकलेल्या छाप्यात सुमारे दोन लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटकडून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक संतोष कसबे, सुनील जावळे व त्यांच्या पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ सापळा रचला.
तापकीर यांच्या शेतातील एका शेडमध्ये विदेशी दारूचा साठा करून विक्रीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाड टाकली. या कारवाईत रामप्रसाद साहेबराव साळुंखे (३३), तिलक हेमंत पटेल (२१) आणि अनिल रामसुरत यादव (२४) यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
घटनास्थळी केलेल्या झडतीत २० खाकी बॉक्स आणि दोन गोण्यांमध्ये लपवून ठेवलेल्या विदेशी दारूच्या ४०० बाटल्या आढळल्या. याशिवाय आरोपींकडील तीन मोबाईल फोनसह एकूण २ लाख ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.