कल्याण स्थानकात थरार; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा धक्का, वाहतूक दोन तास विस्कळीत
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी दुपारी एक थरारक प्रकार घडला. ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढलेल्या एका अज्ञात तरुणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली. अखेर या तरुणाला विजेचा तीव्र धक्का बसून तो खाली कोसळला असून त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ दरम्यान असलेल्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर संबंधित तरुण अचानक चढला. ही घटना लक्षात येताच स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. ओव्हरहेड वायरमध्ये उच्चदाबाचा विद्युत प्रवाह असल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. पोलिसांनी तरुणाला खाली उतरवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी संवाद साधून त्यामागील कारण जाणून घेण्याचाही प्रयत्न झाला; मात्र तो अस्वस्थ व भेदरलेल्या अवस्थेत असल्याने कोणाच्याही सूचनांना प्रतिसाद देत नव्हता.
दरम्यान, गर्दीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करावा लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या मार्गातच थांबवाव्या लागल्या. सुमारे १२० मिनिटे हा प्रकार सुरू राहिल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
या दरम्यान संबंधित तरुणाने खांबांच्या सहाय्याने प्लॅटफॉर्मवरील शेडवर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला विजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.