नवी मुंबईत सिलियर किलरचा हैदोस!

Spread the love

नवी मुंबईत सिलियर किलरचा हैदोस!

‘रमण राघव’सारख्या क्रूर पद्धतीने रस्त्यावरील दोघांची हत्या; पैशांच्या नैराश्यातून हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – रमण राघव ६० च्या दशकात अख्खी मुंबई हादरवून सोडणारा सिलियर किलर. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रमण रस्त्यावर झोपलेल्यांवर हल्ला करायचा. त्यांना ठार मारायचा. अन् वाऱ्यासारखा गायब व्हायचा. त्याच्या या कृत्यामुळे मुंबई हादरून गेली होती. आजही रमण राघवचं नाव घेताच अंगावर काटा येतो. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नवी मुंबईतही रमण राघव सारख्या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे. या माथेफिरूने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन वाटसरूंची हत्या केली. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. कृत्य का केलं याचं त्याने जे कारण दिलं त्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

तुहीन घोष असं या आरोपीचं नाव आहे. तो ३३ वर्षाचा आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन निष्पाप नागरिकांची हत्या करणाऱ्या तुहीन घोषला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तळोजा परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. काही दिवसांपासून त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो खूपच निराश आणि संतप्त झाला होता. त्याच संतापाच्या भरातून आणि नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. पण त्याने केलेल्या कृत्याने नवी मुंबईकर पुरते हादरून गेले आहेत.

तुहीनने नैराशेतूनच सायकलवरून जात असलेल्या राजू बासुमतारी (२९) याच्यावर लोखंडी पाईपने अचानक हल्ला केला. त्यामुळे राजू रक्तबंबाळ होऊन क्षणात सायकलवरून कोसळला आणि तडफडतच त्याने प्राण सोडला. हा प्रकार पाहून मोटारसायकलवरून जात असलेले साईनाथ पाटील यांनी त्याला हल्ला का करत आहे? अशी विचारणा करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्यावरही त्याच लोखंडी पाईपने जोराचा हल्ला केला. या हल्ल्यात साईनाथ पाटील गंभीर जखमी झाले. पाटील यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीद्वारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. “माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे मी खूप रागात होतो आणि त्याच रागातून मी दोन निष्पाप लोकांची हत्या केली,” असे त्याने सांगितल्याचं तळोजाचे एसपी विक्रम कदम यांनी सांगितलं. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon