मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत वितरण अभियंत्याला १० लाख रुपयांची लाच घेताना अटक; सीबीआयच्या छापेमारीत घरातून एकूण १.२४ कोटींचे घबाड जप्त

Spread the love

मध्य रेल्वेच्या मुख्य विद्युत वितरण अभियंत्याला १० लाख रुपयांची लाच घेताना अटक; सीबीआयच्या छापेमारीत घरातून एकूण १.२४ कोटींचे घबाड जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मध्य रेल्वेचा मुख्य विद्युत वितरण अभियंता रमेश कुमार चौबे याला १० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) ही कारवाई केली आहे.रमेश चौबे हा भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी सेवा (आयआरएसईई) २००३ बॅचचा अधिकारी आहे. ४०.५४ कोटी रुपयांची रेल्वे निविदा एका खासगी कंपनीला देण्यासाठी निविदा रकमेतील एक टक्का अर्थात ४० लाख रुपयांची लाच त्याने मागितली होती. या प्रकरणात अंशुल वर्मा आणि कनय वर्मा या दोन खासगी व्यक्तींनाही आरोपी करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली . सीबीआयने सापळा रचल्यानंतर खासगी कंपनीच्या प्रतिनिधीकडून १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रमेश चौबे याला रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे, चौबे याच्या कार्यालयातील कक्षातून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे .

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने चौबे याच्याशी संबंधित मुंबई, नवी मुंबई आणि कर्जत येथे पाच ठिकाणी छापेमारी करत झाडाझडती केली. त्याच्या कार्यालयातून ३.८५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत . तर, घरातून ९०.७९ लाख रुपयांची रोख रक्कम, २४१.३० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २,५७७ ग्रॅम चांदीचे दागिने सापडले आहेत . सोन्या-चांदीच्या दागिन्यांची रक्कम ४२.५२ लाख रुपये आहे. या कारवाईत एकूण १.४७ कोटी रुपयांची रोख रक्कम व दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत , असे सीबीआयने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon