अपघातात जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन लुटणाऱ्या आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन लुटणाऱ्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अपघातात जखमी झालेल्या एका तरुणाला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन जात असताना, सोबत असलेल्या व्यक्तीने जखमीच्या हतबलतेचा फायदा घेत त्याला लुटले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला आजदे गावातून अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिम येथील गोपी चौक परिसरात राहणारा तुषार शिंदे हा तरुण एक वृद्धाश्रम चालवतो. काही दिवसांपूर्वी तुषार आपल्या दुचाकीने मानकोली मोठा गाव ब्रिजवरून जात असताना त्याचा भीषण अपघात झाला. तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून लोक जमले. त्यावेळी सतीश कोरे नावाचा तरुण मदतीसाठी पुढे आला. त्याने माणुसकी दाखवत तुषारला रिक्षात बसवले आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे निघाला.जखमी तुषार वेदनेने विव्हळत असताना रिक्षामध्ये सतीश कोरेची नियत फिरली. तुषारच्या गळ्यातील महागडी सोन्याची चैन पाहून सतीशचा लोभ सुटला. त्याने जखमी तुषारला धाक दाखवून किंवा त्याच्या हतबलतेचा फायदा घेऊन ती चैन हिसकावून घेतली. धक्कादायक म्हणजे, तुषारला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार मिळवून देण्याऐवजी, सतीशने त्याला शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातच सोडून दिले आणि तिथून पळ काढला.
हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तुषारने घडलेला सर्व प्रकार डॉक्टरांना आणि विष्णूनगर पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी प्रशांत मोरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी डोंबिवली पूर्वेतील आजदे गावातून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेली सोन्याची चैन हस्तगत केली असून, सतीशने अशाच प्रकारे इतर कुणाला लुटले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.