३ लाखांची लाच प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

३ लाखांची लाच प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी मोठी कारवाई करत कुरार पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते. उर्वरित एक लाख रुपये देण्यास तक्रारदाराने नकार देत थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार, आज दुपारी उर्वरित एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान आवश्यक पंचनामे करून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एसीबीने दिला आहे. संबंधित प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon