पनवेलमध्ये रिक्षा चालकाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; तब्बल ३ लाख रुपयांचा ऐवज लुटून फरार
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेलमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. करंजाडे परिसरात एका रिक्षा चालकाने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेकडून तब्बल ३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमनाथ भोईर यांच्या पत्नी संगीता भोईर (३६) या पनवेलहून रिक्षाने घरी परतत होत्या. करंजाडे येथील सत्यं ट्रायडंट बिल्डिंगजवळील सर्व्हिस रोडवर पोहोचल्यानंतर रिक्षा चालकाने ‘रिक्षा बंद पडली आहे’ असे सांगून वाहन थांबवले.रिक्षा थांबवल्यानंतर चालकाने अचानक धारदार चाकू काढून संगीता यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हिसकावून रिक्षेसह पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पनवेल परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. नागरिकांनी अनोळखी रिक्षा किंवा वाहनांमध्ये बसताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.