वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे तरुणीचा मृत्यू; डॉक्टर असल्याचे भासवून उपचार, आरोपी अटकेत

Spread the love

वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे तरुणीचा मृत्यू; डॉक्टर असल्याचे भासवून उपचार, आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या निष्काळजीपणामुळे वाशी येथे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रचिती भिकुराम भुवड असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी संदेश पाष्टे (रा. मानखुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिस तपासात आरोपी अंधेरी येथील एका नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीसीओडीमुळे झालेल्या हार्मोनल आजाराच्या उपचाराच्या नावाखाली आरोपीने प्रचितीच्या घरी जाऊन इंजेक्शन दिले. इंजेक्शननंतर तिची प्रकृती बिघडली असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याने दुसरे इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रकृती आणखी गंभीर झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला.

या कथित उपचारांसाठी आरोपीने प्रचितीकडून १५ हजार रुपये घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने नेमकी कोणती औषधे व इंजेक्शन दिली, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे बनावट उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon