बिग बॉस मराठी ६ : कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘पापड’वरून रणकंदन; करण सोनावणे–रुचिता जामदार आमनेसामने
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात दिवसेंदिवस नाट्य अधिकच वाढत चालले आहे. कॅप्टन्सीच्या शर्यतीमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चढाओढ तीव्र झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात मोठा राडा पाहायला मिळाला. ‘पापड बनवणे’ या टास्कमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे आणि अभिनेत्री रुचिता जामदार यांच्यात जोरदार वाद झाला.
बिग बॉसने दिलेल्या या टास्कमध्ये स्पर्धकांना स्वतःचे पापड बनवून त्यांचे रक्षण करायचे होते, तसेच प्रतिस्पर्ध्यांचे पापड मोडण्याची मुभा देण्यात आली होती. वरकरणी साधा वाटणारा हा टास्क प्रत्यक्षात मात्र संघर्षमय ठरला. पापड वाचवताना आणि मोडताना घरातील वातावरण चांगलेच तापले.
याच दरम्यान करण आणि रुचिता यांच्यात शाब्दिक वादाला सुरुवात झाली. टास्क जिंकण्याच्या ईर्ष्येतून दोघेही आक्रमक झाल्याचे दिसून आले. वाद वाढत गेल्याने धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर इतर घरसदस्यांना हस्तक्षेप करून हा वाद थांबवावा लागला.
या घटनेनंतर घरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, कॅप्टन्सीचा टास्क केवळ खेळापुरता न राहता वैयक्तिक संघर्षाचे रूप घेत असल्याचे चित्र आहे. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारणार आणि घराचा नवा कॅप्टन कोण ठरणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.