उल्हासनगर महापालिकेत फासा पलटणार; वंचितचे २ नगरसेवक नॉट रिचेबल,दोन्ही शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यापासून महापालिकेत बहुमतासाठी नगरसेवकांची जुळवाजुळव सुरु आहे.एकीकडे युतीची जोरदार चर्चा आहे, तर दुसरीकडे शिवसेना-भाजप निवडून आलेल्या अन्य ४ नगरसेवकांना त्यांच्या पारड्यात खेचण्याच्या प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी जागा कमी पडत आहेत, त्या ठिकाणी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. उल्हासनगर महापालिकेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अशातच वंचित बहुजन आघाडीचे विजयी झालेले २ नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक १८ मधून विकास खरात आणि सुरेखा सोनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ जागांपैकी शिवसेना शिंदे गटाचे एकूण ३६,भाजपचे ३८ नगरसेवक निवडून आले आहेत.साई पक्षाचा १,काँग्रेसचा १ आणि वंचितचे २ नगरसेवक विजयी झाले आहेत. सत्ता स्थापनेसाठी एकूण ४० नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे. भाजपला २ जागांची,तर शिवसेना शिंदे गटाला ४ जागांची गरज आहे. अशातच भाजप-शिवसेनेनं युती करून सत्ता स्थापन करावी अशी मागणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.
मात्र दोन्ही पक्षांचा इतर पक्षातून निवडून आलेल्या चार सदस्यांवर डोळा आहे.वंचितचे दोन्ही नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. तरी देखील त्यांना आणखीन दोन नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे भाजपा साई पक्ष आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाला आपल्या बाजून खेचून सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. परंतू सर्वांची नजर आत्ता महपौरपदाच्या आरक्षण सोडतीवर आहे.यानंतर राजकीय सूत्रे फिरणार आहेत.