सायकल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
चेंबूरमध्ये प्रकार; ४७ वर्षीय सायकल दुरुस्ती व्यावसायिक अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : सायकल चालविण्यासाठी देतो, असे आमिष दाखवून चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सायकल दुरुस्ती व्यवसाय करणाऱ्या ४७ वर्षीय आरोपीस अटक केली आहे. आरोपीविरोधात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता पीडित मुलगी चेंबूर परिसरात खेळत असताना आरोपीने तिला सायकल देण्याच्या बहाण्याने आपल्या दुकानात बोलावून घेतले. मुलगी दुकानात गेल्यानंतर आरोपीने आतून दरवाजा बंद करत तिच्याशी जबरदस्तीने गैरकृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीने प्रतिकार केला असतानाही आरोपीने अत्याचार केला व हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिली.
घरी परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तक्रारदार महिलेने नेहरुनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून रात्री उशिरा आरोपीस अटक केली.
या घटनेमुळे चेंबूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत असून, पुढील तपास नेहरुनगर पोलीस करत आहेत.