ससून गोळीबार प्रकरणातील फरारी आरोपी अटकेत; तीन वर्षांनंतर भोसलेचा ‘खेळ’ खल्लास
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धावर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात कारवाई तीव्र केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ‘मोक्का’ व तडीपारीसारखी कठोर पावले उचलली जात असतानाच, ससून रुग्णालयात २०२२ मध्ये घडलेल्या गोळीबार व कोयत्याने हल्ला प्रकरणातील कुख्यात फरारी आरोपी रोहित ऊर्फ तम्मा भोसले याला अटक करण्यात आली आहे.
२०२२ मध्ये कुख्यात गुंड तुषार हंबीर याला उपचारासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले असताना पाच हल्लेखोरांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला होता. या हल्ल्यात कोयत्यासह पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. घटनेदरम्यान हंबीरच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर तसेच त्याच्या मेहुण्यावरही हल्ला करण्यात आला होता. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात एकूण ११ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांच्या विरोधात ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यातील बहुतांश आरोपींना अटक झाली होती; मात्र रोहित ऊर्फ तम्मा भोसले गेली तीन वर्षे फरार होता.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत भोसलेला अटक केली. या अटकेमुळे ससून हल्ला प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या ताब्यात आला असून, संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईला बळ मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.