शाळा परिसरात तंबाखू व अमली पदार्थांची खुलेआम विक्री; विद्यार्थ्यांच्या भवितव्याला धोका
दैनिक पोलीस महानगरच्या बातमीचा इम्पॅक्ट

पनवेल : राज्यातील शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर कायद्याने बंदी असतानाही ही विक्री अद्याप थांबलेली नाही. अनेक ठिकाणी ही बेकायदा विक्री खुलेआम सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या भवितव्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करत सरकार व प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका केली. राज्याच्या विविध भागांतून शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, सिगारेट तसेच अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. लहान वयातच विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याने कर्करोगासारखे आजार, मानसिक-शारीरिक आरोग्य समस्या आणि गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांना कारवाईचे निर्देश देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठी त्रुटी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पथकांची माहिती, संपर्क क्रमांक किंवा तक्रार हेल्पलाइन उपलब्ध नसल्याने नागरिकांना तक्रार नोंदवणेही कठीण होत आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मागण्या केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
अधिवेशनात आमदार ठाकूर यांनी १०० मीटर परिसरात तंबाखू व अमली पदार्थ विक्रीवर कडक बंदीची तातडीने अंमलबजावणी, प्रत्येक शाळेबाहेर सूचना फलक व हेल्पलाइनची माहिती, तसेच तक्रारीनंतर कारवाई न झाल्यास जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राज्यभर प्रभावी गस्त व सर्वेक्षण यंत्रणा उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, गुटखा माफियांवर ‘मकोका’ लावण्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात मोठ्या साखळ्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. भिवंडी परिसरातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी असतानाही कारवाई प्रामुख्याने किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित राहते, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नसून, येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे मत पालक आणि शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर व्यसनांचा विळखा समाजासाठी गंभीर ठरू शकतो, असा इशारा दिला जात आहे.