कळवा स्टेशनबाहेर जीआरपी–आरपीएफ कर्मचाऱ्यांना अनधिकृत फेरीवाल्यांची मारहाण; व्हिडिओ व्हायरल, तरीही पोलिसात तक्रार नाही

Spread the love

कळवा स्टेशनबाहेर जीआरपी–आरपीएफ कर्मचाऱ्यांना अनधिकृत फेरीवाल्यांची मारहाण;
व्हिडिओ व्हायरल, तरीही पोलिसात तक्रार नाही

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे : कळवा रेल्वे स्थानकाबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जी.आर.पी आणि आर.पी.एफ कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारवाईदरम्यान झालेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असला तरी, अद्याप ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

मुंबईत अनेक रेल्वे स्थानकांच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा वाढता विळखा आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन जीआरपी आणि आरपीएफकडून नियमित कारवाई केली जाते. अशाच कारवाईदरम्यान कळवा स्थानकाबाहेर तणाव निर्माण झाला. फेरीवाल्यांची मालसामान व वजनकाटे (तराजू) जप्त करताना काही अधिकारी गणवेशाशिवाय उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. यावरून फेरीवाले संतप्त झाले आणि वादळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

वादाचे स्वर आधी बाचाबाचीपर्यंत मर्यादित होते; मात्र काही क्षणांतच त्याचे रुपांतर जोरदार मारहाणीमध्ये झाले. अनधिकृत फेरीविक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनीही घटनेत हस्तक्षेप केल्याचे प्राथमिक माहितीवरून कळते. कारवाई रोखण्यासाठी त्यांनी जीआरपी–आरपीएफ कर्मचाऱ्यांना अडवण्याचा आणि ढकलाढकली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरला असला तरी जीआरपी किंवा आरपीएफकडून अद्याप अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे मारहाणीमागील नेमका संदर्भ, कोणत्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला आणि कोण सहभागी होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

कळवा स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा वाढता त्रास, वारंवार होणाऱ्या कारवायांमधील संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांच्या तक्रारीअभावी पुढील कारवाई होणार का, याकडे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon