नवी दिल्ली : संसदेतील चर्चेनंतर राहुल गांधींचा अमित शाहांवर आरोप; ‘उत्तरं न देता असामान्य वर्तन’
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदेतील भाषणावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तीव्र टीका केली. संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना त्यांनी शाह यांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली नाहीत, तसेच कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत, असा आरोप केला. “अमित शाह घाबरलेले दिसत होते… त्यांच्या हातातही थरथर होती,” असा दावा राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींच्या मते, सभागृहातील शाह यांचे वर्तन असामान्य होते. त्यांनी सभागृहात वापरलेली भाषा योग्य नव्हती, अशी टीका त्यांनी केली. “मी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे सभागृहात मांडले आणि अमित शाहांना थेट चर्चेचे आव्हान दिले. मात्र त्यांनी त्याला उत्तर न देता विषय चुकवला,” असे ते म्हणाले. संसदेतील त्यांच्या वागण्यावरून ते मानसिक दबावाखाली असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला.
निवडणूक संस्थांवरील नियंत्रणाचा आरोप
या दरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. निवडणूक सुधारांवरील चर्चेत त्यांनी दावा केला की, देशातील अनेक संस्थांवर आणि निवडणूक आयोगावर ‘आरएसएसप्रणीत प्रकल्पानुसार’ नियंत्रण मिळवले गेले. मुख्य न्यायाधीशांना निवडणूक आयुक्त निवड समितीतून वगळण्यामागील सरकारचा हेतू काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“२०२३ मध्ये कायदा बदलण्यात आला, ज्यामुळे निवडणूक आयुक्तांना त्यांच्या निर्णयांबाबत जबाबदार धरणे कठीण झाले. जर मताचेच महत्त्व राहिले नाही, तर लोकसभा, विधानसभा ते पंचायतपर्यंत कुठलीही लोकशाही संस्था टिकणार नाही,” असे राहुल गांधी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संस्थात्मक रचनेवर नियंत्रण मिळवण्याचा ‘प्रकल्प’ पुढे नेला गेला, असा गंभीर आरोपही त्यांनी या वेळी केला.
राहुल गांधींच्या या विधानांमुळे संसदेतील राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.