राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे महिंद्रा कार चोरी; काही तासातच पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे – पिंपळनेर बस स्थानक आवारात लावलेली राज्य परिवहन महामंडळाची महिंद्रा सुमो कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. मात्र पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सदर वाहन आमळी परिसरात असल्याचे कळताच २ पथकांमार्फत या वाहनाचा शोध घेतला व या प्रकरणात किरण जगन गायकवाड (२०) यास पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.
दिनांक ९ डिसेंबर रोजी एस टी महामंडळाचे खाते वाहन महिंद्रा सुमो गोल्ड वाहन क्रमांक एम एच ०६ बी एम १३२५ धुळे येथून मार्ग तपासणी करत पिंपळनेर येथे रात्री ०९.३० च्या सुमारास पिंपळनेर बसस्थानक येथे मुक्कामी पोहोचले होते. तेव्हा सदर वाहन पुर्णपणे लॉक करून बसस्थानकाच्या विश्रांती गृहात जाऊन वाहनातील अधिकारी, कर्मचारी झोपुन गेले. दरम्यान पहाटे ०३.३० वाजेचे सुमारास चौधरी हे वाहन बघण्यासाठी गेले असता त्यांना रात्री लावलेल्या जागेवर वाहन दिसुन आले नाही.
याबाबत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना वाहना बाबत विचारपुस केली व त्यांना सांगीतले की वाहन रात्री लावलेल्या ठिकाणी दिसत नाही. तेव्हा सर्वांनी सदर वाहनाचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता वाहन मिळून आले नाही. सदर वाहनाच्या आतमध्ये मद्यप्राशन तपासणी यंत्र, खाते वाहन डायरी व खात्याची जी-१२ पावती पुस्तक अशा महामंडळाच्या वस्तु होत्या. याबाबत एस टी महामंडळ मार्ग तपासणी चालक जगदिश दयाराम चौधरी वय -५७ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी सदर कारवाईत १० लाख रुपये किमतीची पांढ-या रंगाचे महिंद्रा सुमो गोल्ड वाहन, १५ हजार रुपये किमतीचे मद्यप्राशन तपासणी यंत्र, तसेच खाते वाहन डायरी व खात्याची जी-१२ पावती पुस्तक असा एकूण १० लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अतिशय श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे यांच्या पथकाने केली आहे.