मुंबईतील सर्वात मोठया घरफोडीचा पर्दाफाश; पोलीसांना अखेर ८ महिन्यांनी यश, आरोपी महिलेला कल्याणमधून अटक

Spread the love

मुंबईतील सर्वात मोठया घरफोडीचा पर्दाफाश; पोलीसांना अखेर ८ महिन्यांनी यश, आरोपी महिलेला कल्याणमधून अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून तब्बल ३.५६ कोटी रुपयांचे सोने-डायमंडचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या हायप्रोफाईल चोरीचा तब्बल ८ महिन्यांनी छडा लागला आहे. पोलिसांच्या अथक तपासानंतर ही चोरी कोणी केली, याची माहिती उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घरात तात्पुरती काम करणाऱ्या मोलकरणीनेच हा लाखोंचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला कल्याणमधून अटक केली असून तिच्याकडून १ कोटी २७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील एक उच्चभ्रू कुटुंब दुबईत राहत होते. तर त्यांची ९२ वर्षीय आई मुंबईतील घरी वास्तव्यास होती. घरात तीन कायमस्वरूपी नोकर आणि एक साफसफाई कामगार असे चार जण कामाला होते. याच काळात एप्रिल ते जुलै २०२५ या तीन महिन्यांच्या काळात त्यांच्या घरात चोरी झाली. दुबईतून परतल्यावर त्यांना कपाटातील लॉकरमधून १४३७ ग्रॅम वजनाचे साधारण ३ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे सोने-डायमंडचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

परंतु, घरात सीसीटीव्ही नसल्यामुळे आणि कुटुंबिय बाहेर असल्याने चोरीची नेमकी तारीख निश्चित करता येत नव्हती. लाखो रुपयांची चोरी झाली. पण काहीही माहिती नव्हती. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. साधारण ८ महिने पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप चौधरी यांच्या पथकाने संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला.

यावेळी पोलीस पथकाने घरातील सर्व नोकर आणि संबंधित साक्षीदारांची कसून चौकशी केली. त्यांना मिळालेल्या माहितीचा आणि तांत्रिक पुराव्यांचा धागा पकडत पोलिसांनी हळू हळू तपास केला. अखेरीस, पोलिसांना अर्चना सुनिल साळवी (४४) या महिलेबद्दल माहिती मिळाली. ही महिला मे २०२५ मध्ये केवळ काही दिवसांसाठी फिर्यादींच्या आईची काळजी घेण्यासाठी तात्पुरती मोलकरीण म्हणून कामावर आली होती.पोलिसांनी अर्चना साळवी हिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर अर्चनाने या गुन्ह्याची कबुली दिली. फिर्यादींच्या गैरहजेरीत आणि वृद्ध आई घरी असताना केवळ काही दिवसांसाठी कामावर आलेल्या या मोलकरणीने अत्यंत चलाखीने घरात प्रवेश मिळवला. त्याच काळात तिने कोट्यवधींचे दागिने चोरले आणि कोणालाही संशय येऊ न देता ती कामावरून निघून गेली. आठ महिने कोणालाही याचा थांगपत्ता लागला नाही.

पोलिसांनी आरोपी अर्चना साळवीला अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल १२४९ ग्रॅम सोन्या-डायमंडचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत १ कोटी २७ लाख ३१ हजार रुपये आहे. चोरीचा हा एवढा मोठा ऐवज अर्चनाने एकटीने चोरला की यात आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच तिने चोरी नेमकी कशी केली आणि उर्वरित ऐवज कुठे दडवला आहे, याचा कसून तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon