नवी मुंबईत ‘दादा’ राजकारणाला उघड पाठबळ? पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी गुंडांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह

Spread the love

नवी मुंबईत ‘दादा’ राजकारणाला उघड पाठबळ?
पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी गुंडांवरील कारवाईवर प्रश्नचिन्ह

नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुका तोंडावर असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत स्वयंघोषित ‘भाई–दादा’ बेधडक वावरत असल्याचे चित्र असून, गंभीर गुन्ह्यांत रेकॉर्डवर असलेले आरोपीही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत गुंतलेले प्रसाद रंगीले उर्फ गोलू, विकास निकम, सनी कैकाडी आणि राजकुमार म्हात्रे हे आरोपी अद्याप तडीपार किंवा अटकेच्या कारवाईपासून दूर असल्याने ‘राजकीय आश्रयामुळेच ही शिथिलता का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या गुंडांना काही राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस यंत्रणाही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. परिणामी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या आणि स्नायूबळाच्या जोरावर उमेदवारांना धमकावणे, वातावरण दहशतीखाली ठेवणे आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी “माझ्या महाराष्ट्रात गुंडांना जागा नाही,” अशी ठाम घोषणा केली होती. मात्र, नवी मुंबईतील सध्याचे चित्र पाहता ही घोषणा फोल ठरत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणुकीपूर्वी या गुंडांवर कठोर कारवाई झाली नाही, तर पनवेल महापालिकेच्या निवडणुका ‘गन पॉइंटवर’ होणार का, अशी भीतीही आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
“गुन्हेगारांना मिळणारे राजकीय संरक्षण थांबवा आणि कायद्याला त्याची भूमिका बजावू द्या,” अशी ठाम मागणी नवी मुंबईकरांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon