८ वर्षाचा चिमुकला खेळताना बेपत्ता, पाच दिवसांनी आढळला मृतदेह; कुटुंबावर शोककळा
योगेश पांडे / वार्ताहर
नालासोपारा – नालासोपाऱ्यात एका दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. पाच दिवसांपासून ८ वर्षांचा मेहराज शेख बेपत्ता होता. आता या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुकला राहत असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्येच त्याचा मृतदेह सापडला. इमारतीत पसरलेल्या दुर्गंधीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पाण्याची टाकी उघडी का होती? तसंच हा निष्काळजीपणा झाला का? याचा तपास सुरू आहे.
करारी बाग परिसरातील फातिमा मंजिल इमारतीत राहणारा मेहराज ३ डिसेंबर रोजी घराबाहेर खेळताना बेपत्ता झाला होता. तो कुठेही सापडत नसल्याने त्याचा सगळीकडे शोध सुरू होता. मात्र मेहराज सापडला नसल्याने त्याच्या आईने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही नोंदवला होता. मात्र, सोमवारी सकाळी इमारतीतून मोठ्या दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी तपास केला असता. तपासादरम्यान पाण्याच्या टाकीत काहीतरी संशयास्पद असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं. संशयास्पद वाटत असलेल्या पाण्याच्या टाकीत तपासणी करण्यात आली. यावेळी कुजलेल्या अवस्थेतील मुलाचा मृतदेह टाकीत आढळला. या मृतदेहाची ओळख मेहराज म्हणून पटली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, मेहराज खेळता खेळता उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला असावा आणि कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वी तिथेच बुडून त्याचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज आहे. सेंट गोंसालो गार्सिया सेमी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारा मेहराज त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून, अशाप्रकारे पाण्याच्या टाकीत टाकीत त्याचा मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. टाकी उघडी का होती याचा तपास केला जात आहे आणि बेपत्ता झाल्यापासून मृतदेह सापडेपर्यंतची संपूर्ण चौकशी सुरू आहे. ही हृदयद्रावक घटना प्रत्येक पालकाच्या मनाला चटका लावणारी ठरत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मेहराजच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.