ठाण्याच्या बालेकिल्यात ‘टाइगर अभी जिन्दा है ‘.

Spread the love

ठाण्याच्या बालेकिल्यात ‘टाइगर अभी जिन्दा है ‘.

गेल्या २ दिवसांपासून मातोश्रीवर पक्षप्रवेशांना वेग; ठाकरेंचा ‘रिव्हर्स गियर’; शिंदेंची डोकेदुखी वाढली

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असताना भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष वाढला आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीमधील दोन पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे यांनी शिंदेंना शह देण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यापासून झालेली आहे.

गेल्या २ दिवसांपासून मातोश्रीवर पक्षप्रवेशांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख आबा मोरे यांच्यासह जवळपास २०० कार्यकर्त्यांनी मंगळवारी मातोश्री गाठत ठाकरेसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं. ठाण्यातील जवळपास संपूर्ण संघटना शिंदेंसोबत गेली. पण आता शिंदे यांना भाजपकडून ठाण्यात आव्हान मिळू लागलं आहे. त्यातच आता काही पदाधिकाऱ्यांनी ‘रिव्हर्स गियर’ टाकल्यानं शिंदेंची अडचण होताना दिसत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-भाजपमध्ये प्रचंड जुंपली आहे. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा अक्षरश: धडाका लावलेला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनीदेखील शिंदेंना धक्का दिल्याची चर्चा आहे. स्थानिक माजी नगरसेवकांकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आणि गेल्या ९ वर्षांत त्यांनी स्थानिकांचं एकही काम न केल्याचा आरोप करत कोपरीतील जुने शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी केला. कोपरीत आम्हाला आमच्याच पक्षात कोणी वाली नसल्याची भावना उपविभागप्रमुख आबा मोरे यांनी बोलून दाखवली.

ठाण्यात रिव्हर्स गियर पडून २४ तासही उलटले नसताना शेजारच्या नवी मुंबईतही शिंदेसेनेला हादरा बसला. तिथल्या पदाधिकाऱ्यांनी परतीचे दोर लावत ठाकरेसेनेत प्रवेश केला. शिंदेसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख शिरीश पाटील, उपविभागप्रमुख मयूर ठाकूर, संदीप साळवे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला.

आतापर्यंत भाजपकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलं जातं. त्याची तक्रार करण्यासाठी शिंदे यांना दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्षांची तक्रार केली. पण आता शिंदेसेनेचे पदाधिकारी घरवापसी करु लागल्यानं शिंदेंसमोर दुहेरी आव्हान आहे. एकीकडे भाजप, तर दुसरीकडे ठाकरे अशा दोन आघाड्यांवर शिंदेंना लढावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon