येवला निवडणुकीत पैसे वाटपाचं प्रकरण; शिंदे गटाच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – येवला नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच मतदारांना प्रलोभन देऊन त्यांचे मत विकत घेण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गट पुरस्कृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराशी संबंधित असलेल्या एका कर्मचाऱ्याला पैसे वाटप करताना संतप्त नागरिकांनी रंगेहात पकडले. या गंभीर घटनेमुळे निवडणुकीच्या काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे मोठे उल्लंघन झाले असून, निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आमदार दराडे यांच्या संस्थेत कार्यरत असलेला हनुमंत बोरसे या कर्मचाऱ्याला मतदारांना रोख रक्कम वाटप करताना नागरिकांनी पकडले. मतदानाच्या महत्त्वाच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. लोकांनी तत्काळ या व्यक्तीला चांगलाच चोप देत, त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेतली आणि येवला शहर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. पोलिसांनी आरोपी कर्मचारी हनुमंत बोरसे याच्यावर लोकप्रतिनिधी कायदा,१९५१ चे कलम १७१ (ब) (क) आणि १२३ (१) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सर्व कलमांनुसार, मतदारांना लाच देणे, प्रलोभन देणे किंवा निवडणुकीच्या निकालावर अवैध मार्गाने प्रभाव टाकणे हे गंभीर दंडनीय गुन्हे आहेत. पोलिसांनी बोरसेला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने एक महत्त्वपूर्ण कबुली दिली आहे. त्याने आपला संबंध शिवसेना शिंदे गट तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपेश दराडे यांच्या गटाशी असल्याचे सांगितले आहे. ही कबुली निवडणूक कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. ही केवळ एका कर्मचाऱ्याची वैयक्तिक कृती आहे की, यामागे काही नियोजन आहे, याबाबत आता स्वतंत्र आणि सखोल चौकशी केली जाणार आहे.