धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर अश्लील चाळे; संतापलेल्या जमावाकडून आरोपींना चोप, कल्याण जीआरपी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – मुंबई आणि ठाणे परिसरातील रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबई लोकल आणि स्टेशन परिसरात विनयभंग, अश्लील चाळे याप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातच आता सीएसएमटी-अंबरनाथ धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्थानकांवरील आणि लोकल ट्रेनमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशासमोर दोन तरुणांनी अत्यंत संतापजनक कृत्य केले. तिची लोकल ट्रेन सीएसएमटीवरून सुटताच या दोन्ही आरोपींनी महिला प्रवाशाची छेड काढण्यास आणि तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हा धक्कादायक प्रकार पाहता महिलेने तातडीने आपल्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. त्यांची ट्रेन उल्हासनगर रेल्वे स्थानकावर थांबल्यावर महिलेचे नातेवाईक आणि संतप्त झालेले अन्य सहप्रवासी यांनी या दोन्ही तरुणांना पकडले.
या संतापलेल्या जमावाने आरोपींना चांगलाच चोप देऊन त्यांना धडा शिकवला. यानंतर या दोन्ही आरोपींना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या कल्याण जीआरपी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.