सांगलीत राडा, स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात २९०० मतांचा फरक

Spread the love

सांगलीत राडा, स्ट्र्राँग रुमबाहेर मोठ्या संख्येनं जमले लोकं; नगरपालिकेसाठी झालेल्या मतदानात २९०० मतांचा फरक

योगेश पांडे / वार्ताहर

सांगली – राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत काही नगराध्यक्ष आणि प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक निकालाची तारीखही बदलली आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख २१ करण्यात आली आहे. त्यामुळे, तब्बल १८ दिवस ईव्हीएम मतदान पेट्या सांभाळून ठेवणे, तेथील सुरक्षा व्यवस्थाचा चोख बंदोबस्त करणे हे प्रशासन आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. त्यातच, सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्यने कार्यकर्ते जमा झाले.

आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलसमोर आष्टा मधील बहुसंख्य नागरिक जमा झाले. मंगळवारी झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला.

आष्टा नगरपरिषदेसाठी शहरात एकूण मतदारसंख्या ३०,५७४ एवढी असून झालेलं मतदान २२,८६४ एवढं आहे. परंतु, नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये, जवळपास २ हजारपेक्षा अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे, हे पूर्णपणे चूक आहे. पोर्लटवरुन मिळालेल्या यादीत एकूण मतसंख्या ३३ हजार ३२८ दाखवली आहे, एका प्रभागात १३११ मतदार असताना ४०७७ मतदारसंख्या दाखवली आहे. प्रभाग ६ नंबर मध्ये एकूण ३०५६ मतदारांची संख्या आहे. मतदान झालं २३९४, पण पोर्टलवर १७९५ दाखवलं आहे, अशा अनेक त्रुटी आढळल्याने आष्टा शहर विकास आघाडीच्या वैभव शिंदे यांनी स्ट्राँग रुमबाहेर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

पत्रकारांच्या ग्रुपवरील आकडेवारी आणि एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात थोडी तफावत होती. त्यावरुन, हा विषय निघाला. मात्र, आपण जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला जी आकडेवारी कळवली ती नमुना व्हीएम ३ नुसारच कळवली आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. केवळ संभ्रम झालेला असून तो संभ्रम दूर करण्यासाठीच आपण इथं आलोय, असे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. मात्र, आता गोंधळ झाला त्यावेळी स्ट्राँगरुमच्या समोर फक्त आष्टा शहर विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. स्टाँग रुमबाहेर २४ तास सीसीटीव्ही पाहिजे, प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी स्ट्राँग रुममबाहेर पाहिजे, या भागात जॅमर बसवा. पहिल्या रात्री हा गोंधळ तर पुढे काय होईल, असा सवाल संतप्त पदाधिकारी व उमेदवारांना उपस्थित केला. २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, झालेलं मतदान आणि जाहीर केलेलं मतदान चुकीचं आहे. आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्टा बंद करू, असा इशाराही आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. पोर्टलवरील यादीत एकूण ३३,०२८ मतदार दाखवले असून झालेलं मतदान २४,९१३ एवढच झालेलं आहे. पण, खरं मतदान २२८६४ इतकंच झालं आहे. म्हणजे, तब्बल २९०० मतदान जास्त आहे, रात्री ही माहिती अपलोड केल्याचेही वैभव शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon