उरणमध्ये पोलीस ठाण्याच्या हाकेवर फर्नेस ऑयलचा काळाबाजार; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

उरण : उरण तालुक्यातील पगोटे व कुंडे परिसरात फर्नेस ऑयल, केमिकल्स व इतर पेट्रोलियम पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा व विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण काळाबाजार न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत व हाकेच्या अंतरावर सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार हरीश भोईर, जुम्मन पठाण व वसीम ही नावे या अवैध धंद्याच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या टँकर्समधून फर्नेस ऑयल उतरवून ते तातडीने लहान टँकर्स व ड्रम्समध्ये भरले जाते आणि राज्याबाहेर पाठवले जाते, असा प्रकार सातत्याने सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध साठा शिवसेना कार्यालयासमोरील पार्किंग व कुंडे गावातील खड्डा पार्किंग परिसरात उघडपणे सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.
या काळाबाजारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. फर्नेस ऑयल व केमिकल्सचा असुरक्षित साठा अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई फिरू लागली आहे. मनुष्यबळाचा अभाव आहे की राजकीय संरक्षणामुळे कारवाई टाळली जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “पोलीस ठाण्याच्या शब्दशः हाकेच्या अंतरावर एवढा मोठा काळाबाजार निर्धास्तपणे कसा चालू शकतो?”, हा प्रश्न उरणकरांना सतावत आहे.
हा प्रश्न केवळ आर्थिक नुकसानापुरता मर्यादित नसून उरणकरांच्या जीवित व पर्यावरणाच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून हा अवैध धंदा बंद करावा, अन्यथा त्याचे भयावह परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात येत आहे.