मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणे यांच्या आरोपांना उत्तर देईन – रविंद्र चव्हाण
महायुतीला भगदाड पडणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गेल्या दोन आठवड्या पासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. शिंदे सेनेतील उमेदवारच भाजपने पळवल्याने शिंदे नाराज झाले होते. त्यांची दिल्लीवारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यावरच भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान कोकणात निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड घालत पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. तर इकडे मराठवाड्यात शिंदे सेनेचे आमदार संजय बांगर यांच्या घरी भल्या पहाटे १०० पोलिसांनी छापा घातल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही पक्षातील काही ठिकाणचे वाद विकोपाला गेले आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे.
महायुतीत तणाव वाढताना दिसत आहे. शिंदे सेना आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी तेढ निर्माण झाली आहे. कोकणातील पैस वाटपाच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनी मोठी बोलकी प्रतिक्रिया दिली. “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. याबद्दल नंतर बोलेन.ते खोटे बोलत आहेत.” असे मोठे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले. त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव असल्याचे समोर येत आहे. चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये प्रचारासाठी आले होते. तर मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या विविध योजनांची उजळणी घेत विरोधकांवर तोंडसूख घेतले.
चाळीसगावमध्ये प्रचाराला आले असताना रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. त्यावर चव्हाण यांनी सूचक इशारा दिला. मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणे यांच्या आरोपांना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे, असे चव्हाण म्हणाले. तर चव्हाण यांच्यामुळे महायुतीत वितुष्ट येत असल्याचा आरोप शिंदे सेनेने केला आहे.