हिंगोलीत राजकीय वाद चव्हाट्यावर : संतोष बांगर यांच्या घरावर पहाटे धाड; भाजप आमदारावर दबावाचा आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला असून कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरावर पहाटे पोलिसांनी घातलेल्या धाडीनंतर वातावरण तापले आहे. तब्बल १०० पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. ही झाडाझडती “गुंडाच्या घराप्रमाणे” घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील राजकीय संघर्षातच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. “भाजप आमदाराच्या दबावाखाली ही धाड टाकण्यात आली,” असा थेट आरोप त्यांनी केला.
पाटील म्हणाले, “संतोष बांगर यांच्या ७५ वर्षीय आजारी आईसमोर पहाटे ५ वाजता घेतलेली झाडाझडती अत्यंत अमानवी आहे. आमदारांच्या घरावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी आवश्यक असते; मात्र तसा कोणताही आदेश पोलिसांकडे नव्हता. मग ही कारवाई कुणाच्या सांगण्यावर झाली?”
हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, “राज्यात आम्ही सत्तेतील समसमान भागीदार आहोत, तरीही स्थानिक भाजप आमदार पोलिसांवर दबाव टाकत आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहोत.”
दरम्यान, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी संतोष बांगर यांच्यावर पलटवार केला. “बांगर हा हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे. त्यांचे अनेक अवैध धंदे आहेत. ते पैशांशिवाय राहू शकत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच “सत्तांतराच्या काळात बांगर यांनी ५० खोके घेतले, ही सत्य घटना आहे,” असा दावा मुटकुळे यांनी केला.
या प्रकरणामुळे हिंगोलीतील महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तणाव चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.