अखेर शहाड उड्डाणपूल २० दिवसांनी वाहतुकीसाठी खुला; नागरिकांना दिलासा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण–मुरबाड मार्गावरील महत्त्वाचा समजला जाणारा शहाड उड्डाणपूल तब्बल २० दिवसांच्या बंदोबस्तानंतर अखेर काल मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. डांबरीकरणाच्या कामासाठी ३ नोव्हेंबरपासून हा पूल बंद ठेवण्यात आला होता. या काळात कल्याण पूर्व–पश्चिम भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.
पावसाळ्यात उड्डाणपुलावरील खोल खड्डे, वाढत्या अपघातांचा धोका आणि पुलाच्या झालेल्या झिजेमुळे तातडीने दुरुस्तीची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले. मात्र पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्गांची दुरुस्ती, विशेषतः वालधुनी पुलावरील खड्डे भरण्याचे काम न केल्याने सर्व वाहतूक त्याच पुलावर वळवावी लागली आणि परिस्थिती अधिक बिकट झाली.
दररोजच्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा मोठा वेळ वाया जाणे, पेट्रोल–डिझेलचे वाढलेले खर्च आणि मानसिक त्रास यामुळे सामान्य जनतेत नाराजीची लाट उसळली होती. “नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेण्याची प्रशासनाची इच्छाच दिसत नाही,” अशी सर्वसाधारण भावना नागरिकांत निर्माण झाली होती.
दरम्यान, सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शहाड उड्डाणपूल अखेर उघडण्यात आला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या दुरुस्तीचे आयुष्य पावसाळा येईपर्यंत टिकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तब्बल २० दिवसांच्या त्रासानंतर नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत. “इतका मोठा त्रास सहन करून झालेले काम जर पुन्हा काही महिन्यांत उखडले, तर हे अत्याचार किती दिवस सहन करायचे?”
उड्डाणपूल सुरु झाल्याने वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल अशी अपेक्षा असली तरी, कामाच्या गुणवत्तेबाबत आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.