नोटीस घरी स्वीकारणार नाही, अमित ठाकरेंच्या भूमिकेमुळे पोलीस शिवतीर्थाबाहेर ताटकळले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेरुळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यामुळे आणि जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नोटीस देण्यासाठी बुधवारी पोलीस शिवतीर्थावर आले पोहोचले, मात्र अमित ठाकरेंनी घरी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.
नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी बुधवारी पोलीस अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचले. मात्र अमित ठाकरे यांनी मी नेरूळ पोलीस स्टेशनला आलो असतो नोटीस घरी स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे नेरूळ पोलीस शिवतीर्थाबाहेर नोटीस देण्यासाठी वेटिंगवर असल्याचे पहायला मिळाले.
अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘महाराजांसाठी पहिली केस झाली असेल तर चांगलं आहे. मला बरं वाटतंय. काल दिघा आणि कोपर खैराणे ला गेलेलो. गजानन काळे सोबत होते. त्यांनी सांगीतलं की महाराजांचा पुतळा आहे पण चार महिने अनेक आंदोलने करून देखील खुला केला नाही. काल त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्घाटन केले’ असं अमित ठाकरे म्हणाले होते.
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले होते की, ‘महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो. गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उदघाटन करायला वेळ नाही मिळाला. त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू. पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केला आहे. पोलिसांचे काम आहे, त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांवर वरून प्रेशर असतो.’