बुलढाण्यात खळबळ! १,०५० पोलीस कर्मचाऱ्यांना आयकर चोरीच्या संशयावरून नोटीस
पोलीस महानगर नेटवर्क
बुलढाणा – बुलढाणा जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाच्या नोटिसांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. तब्बल १,०५० पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षांतील आयकर विवरणपत्रांमध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी केल्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे.
आयकर विभागाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाच नोटीस पाठवली असून, या घटनेने संपूर्ण पोलिस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कलम ८० सी तसेच गृहकर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत खोट्या गुंतवणुका दाखवत कर कपात मिळवली आहे. प्रत्यक्षात संबंधितांकडे ना विमा पॉलिसी, ना पीपीएफ खाते, ना म्युच्युअल फंड गुंतवणूक, ना गृहकर्ज असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार एका चार्टर्ड अकाउंटंटच्या संगनमताने गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा संशय असून, आयकर विभागाच्या पडताळणीत ही बाब उघड झाली आहे.
दरम्यान, या घडामोडींची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी ६ नोव्हेंबर रोजी सर्व पोलीस अंमलदारांना आपले आयकर विवरणपत्र तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जर कोणत्याही कर्मचाऱ्याच्या विवरणपत्रात चुका आढळल्यास तात्काळ सुधारित रिटर्न दाखल करावेत.”
आयकर चोरीच्या संशयावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली गेल्याची ही अभूतपूर्व घटना असल्याने, बुलढाणा जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे.
या संदर्भात विचारणा केल्यावर पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, “संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करूनच मी अधिकृत भूमिका मांडेन.”