गतिमंद विद्यार्थ्यांवर कुकरच्या झाकणाने मारहाण; शिपाई-केअरटेकर निलंबित, गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजी नगर – मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात मानवीयतेला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यालयातील शिपाई दीपक इंगळे व केअरटेकर प्रदीप देहाडे यांनी गतिमंद विद्यार्थ्यांना कुकरच्या झाकणाने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
या प्रकरणी दोघांनाही निलंबित करून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले की, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
दीपक इंगळे हा संस्थाचालकाचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे. या संतापजनक घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत असून, संस्थेवरील देखरेखीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांनीही घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटलं की, “ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही, त्या मुलांच्या अश्रूंनी सरकार आणि समाजाला जागं केलं पाहिजे; अन्यथा माणुसकीचं कुकरचं झाकण कायमचं बंद होईल.”