‘ड्राय डे’ला मद्य विक्रीचा पर्दाफाश; हिंजवडीतील हॉटेल मालकासह चौघांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्य विक्रीवरील बंदीचा भंग करत हॉटेलमधून अवैधरित्या मद्य विक्री केल्याप्रकरणी हिंजवडीतील एका हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक तसेच जागा मालक यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई हिंजवडी येथील साखरेवस्ती परिसरातील एका हॉटेलवर करण्यात आली. पोलिस शिपाई अजित शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक आणि व्यवस्थापक यांनी ‘ड्राय डे’ असतानाही कोणताही वैध परवाना नसताना हॉटेलमध्ये ४४ हजार ८६५ रुपये किमतीचे मद्य विक्री केल्याचे उघड झाले. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही अवैध विक्री केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, हॉटेलकडे मद्य विक्रीचा परवाना नसल्याची माहिती असूनही जागा मालकांनी संबंधित जागा भाड्याने उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.