पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील भयंकर घटना; मृतदेहांची अदलाबदल! कुटुंबीयांनी भलत्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेल उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. खारघर येथील सुशांत मल्लम यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात एक मृतदेह दाखवण्यात आला होता. पण तो मृतदेह त्यांच्या मुलाचा (सुशांत मल्लम) नसल्याचं उघडकीस आलं. २० ऑक्टोबर रोजी सुशांत मल्लम यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. चार दिवसांनंतर मल्लमचे कुटुंबीय नेपाळहून रुग्णालयात पोहोचले. तेव्हा त्यांना जो मृतदेह दाखवण्यात आला, तो त्यांचा मुलाचा नसल्याचं उघडकीस आलं.दाखवलेला मृतदेह त्यांचा मुलाचा नसून चुकीने अंत्यसंस्कार करण्यात आला.
या विचित्र प्रकारामुळे सुशांत मल्लम यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत मल्लम यांनी आत्महत्या केल्याची घटना ज्या दिवशी घडली होती, त्याच दिवशी नवीन पनवेल येथील सुरक्षा रक्षक बिष्णा रावत यांनीही आत्महत्या केली होती.पोस्टमार्टमनंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात संपर्क साधला. मृत व्यक्तीचे कुटुंबीय नेपाळमध्ये असल्याने त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे मृतदेहाची ओळख पटवून दिली.
परंतु,ओळख प्रक्रियेत चूक झाल्याने सुशांत मल्लम यांच्या मृतदेहाऐवजी दुसराच मृतदेह पाठवण्यात आल्या आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारीडॉ अशोक गीते माहिती दिली की,दोन्ही मृत्यू एकाच दिवशी झाले आणि दोन्ही कुटुंब नेपाळमधील असल्याने ओळख प्रक्रियेत गोंधळ झाला.रुग्णालय प्रशासनाने तत्काळ दोन्ही कुटुंबांना बोलावून चर्चेद्वारे तोडगा काढला.अखेरीस दोन्ही कुटुंबांनी परस्पर सहमतीने उरलेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यास संमती दर्शवली आणि प्रकरण मिटलं.