“डिजिटल अरेस्ट” गुन्ह्यातील आंतरराज्यीय सायबर टोळीला मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; सहा आरोपी अटकेत, १०.५० लाख रुपये गोठवले!

Spread the love

“डिजिटल अरेस्ट” गुन्ह्यातील आंतरराज्यीय सायबर टोळीला मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; सहा आरोपी अटकेत, १०.५० लाख रुपये गोठवले! 

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई – आर. ए. के. मार्ग पोलिसांनी “डिजिटल अरेस्ट” प्रकारातील आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे. या टोळीने स्वतःला एटीएस आणि एनआयए अधिकारी म्हणून भासवून नागरिकांना फसवून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादीला अनोळखी व्यक्तींनी “तुमचे नाव पीएमएलए केसमध्ये आहे” असे सांगत त्यांचे बँक खाते गोठवले जाईल, अशी भीती दाखवली. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलवर स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर करत त्यांनी एकूण ₹७० लाखांची फसवणूक केली.

या प्रकरणी आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास करताना पोलिसांनी १५ बँक खाती गोठवून ₹१०.५० लाख रुपये वाचवले.

तपासादरम्यान आरोपींचा माग काढताना त्यांचे ठिकाण गुजरात आणि राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले. पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबवली. अटक आरोपींमध्ये सुरेशकुमार मगनलाल पटेल (५१), मुसरान इक्बालभाई कुंभार (३०), चिराग महेशभाई चौधरी (२९), अंकितकुमार महेशभाई शाह (४०), वासुदेव उर्फ विवान वालजीभाई बारोट (२७) व युवराज उर्फ मार्को लक्ष्मणसिंग सिकरवार (३४) यांचा समावेश आहे.

यापैकी मुख्य आरोपी युवराज उर्फ मार्को हा मागील दोन ते तीन वर्षांपासून विविध सायबर फसवणुकीत सक्रिय होता, तर उर्वरित आरोपी बँक करंट अकाउंट आणि सीमकार्ड पुरविण्याचे काम करीत होते.

तपासात समोर आले की या टोळीचे जाळे देशभर पसरले असून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ, झारखंड आणि हरियाणा या १३ राज्यांमधील सायबर युनिटमध्ये एकूण ३१ तक्रारी नोंद झाल्या आहेत.

याचप्रमाणे, पनवेल येथील ६८ वर्षीय नागरिकालाही अशाच पद्धतीने फसविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना “अतिरेक्यांच्या यादीत नाव आहे” असे सांगून डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या नातेवाईकांच्या जागरूकतेमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ₹४० लाखांची रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीविरोधात मोठा धक्का बसला असून इतर राज्यांमधील पोलिसांनाही या प्रकरणात पुढील तपासासाठी माहिती देण्यात आली आहे.

सदर कारवाई ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त श्री सत्यनारायण चौधरी, (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई, अपर पोलिस पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-४) श्रीमती रागसुधा, सहाय्यक पोलीस आयुक्त (माटुंगा विभाग) श्री. सचिन कदम तसेच र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या यशस्वी तपास मोहिमेत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. संदीप ऐदाळे, तसेच गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री. गोविंद खैरे, श्री. महेश मोहिते आणि त्यांचे पथक, सायबर अधिकारी श्री. योगेश खरात व ए.टी.सी. पथकाचे सदस्य यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे “डिजिटल अरेस्ट” प्रकरणातील आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon