जय अंबेनगरमध्ये प्राकृतिक तलावाची भरणी; झोपडी माफियांचा धडाका सुरूच!
मुंबई उपनगरातील चेंबूर परिसरात प्रशासनाच्या नजरेआड सुरू असलेल्या बेकायदेशीर कामांमुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एम-पश्चिम विभागातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत जय अंबेनगर परिसरातील सुमारे सात दशकांपूर्वीचा प्राकृतिक तलाव भरून अवैध बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या तलावाचे अस्तित्व गेल्या अनेक वर्षांपासून होते आणि परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा या तलावामध्ये व्हायचा. मात्र अलीकडच्या काळात काही झोपडामाफियांनी तलावाची भरणी करून त्या ठिकाणी झोपड्यांचे बेकायदेशीर बांधकाम उभारण्यास सुरुवात केली आहे.
संगम, सफलता, आश्रय, पिकनिक पॉइंट, रॉयल आणि समृद्धी लॉजिंगच्या पाठीमागील भागात हे अवैध बांधकाम खुलेपणे सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ही कामे दिवसाढवळ्या सुरू असूनही संबंधित प्रशासन मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
झोपडामाफियांमागे “दिवाकर प्रजापती गँग”चा हात?
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या बेकायदेशीर भरणीमागे दिवाकर सोनई प्रजापती, अमजद, तंबी अन्ना आणि कलीम अशी नावे पुढे आली आहेत. त्यापैकी दिवाकर प्रजापती हा परिसरातील झोपडामाफियांचा प्रमुख असून, बाहेरील कामगारांना आणून तलाव भरण्याचे आणि झोपड्या बांधण्याचे काम तो करवून घेतो, अशी माहिती मिळाली आहे.
एका रहिवाशाने सांगितले की, “दिवाकर प्रजापती हा गुंड प्रवृत्तीचा असून, मनपा व पोलिस अधिकाऱ्यांशी त्याचे सख्य आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोणीही उघडपणे कारवाई करण्यास धजावत नाही.”
पोलिस आणि मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह
टिळक नगर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “दिवाकर हा अत्यंत चलाख आणि प्रभावशाली व्यक्ती आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास अधिकारीही घाबरतात.”
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी प्रजापती आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर केवळ नोटीस देऊन प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नागरिकांची प्रशासनाकडे मागणी
जय अंबेनगर परिसरातील नागरिकांनी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला तत्काळ हस्तक्षेप करून तलाव भरणी थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच या अवैध कारवायांमध्ये सहभागी सर्व व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करून तलाव पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील पर्यावरणप्रेमींचा इशारा आहे की, “जर ही भरणी तत्काळ थांबवली नाही, तर भविष्यात पावसाळ्यात जलनिकासी व्यवस्था कोलमडून गंभीर पूरस्थिती निर्माण होऊ शकते.”