कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार निघाला बनावट नोटा छापणारा ‘म्होरक्या; १ कोटी ११ लाखांच्या बनावट नोटा जप्त करत ५ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कोल्हापुर – बनावट नोटा तयार करून व्यवहारात आणणाऱ्या कोल्हापूरच्या टोळीला मिरजेत सांगली पोलिसांनी जेरबंद केलं आहे. धक्कादायक म्हणजे कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार या सगळ्याचा मास्टर माईंड असल्याचं समोर आलं आहे. तब्बल १ कोटी ११ लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे. इब्रार इनामदार कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत आहे. मात्र, या इनामदार पोलीस कर्मचाऱ्यांचे कारनामे काही वेगळेच सुरू होते. त्याने सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या नावाखाली त्यानं चक्क बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मास्टर माईंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार, सुप्रीत काहाण्या देसाई, राहुल राजाराम जाधव, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, सिध्देश जगदीश म्हात्रे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सांगली पोलिसांना कुणकुण लागली आणि मिरजेमध्ये सापळा रचला गेला. इनामदारकडून घेतलेल्या नोटा सुप्रीत देसाई सांगली जिल्ह्यामध्ये देण्यासाठी आला होता. त्यावेळी सांगली पोलिसांनी ४२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्याला ताब्यात घेतले. देसाईकडे चौकशी केली असता कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार इनामदारच्या सिद्ध लक्ष्मी चहा दुकानात या नोटा छापत असल्याचे समोर आले. सांगली पोलिसांनी इनामदारसह पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून ५०० आणि २०० रुपयांच्या एक कोटी किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर कलर झेरॉक्स, मशीन स्कॅनर, प्रिंटर, वाहन आधी सामान सांगली पोलिसांनी जप्त केले.
इनामदार हा सुप्रीत देसाईला पाचशेच्या एका नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देत होता, तर सुप्रीत देसाई हा पाचशे रुपयांच्या एका नोटेच्या बदल्यात दोन बनावट नोटा देत होता. राहुल जाधव हा तस्करीच्या प्रकरणात तुरुंगात असताना त्याने बनावट नोटा छापायचे तंत्र शिकून घेतले. त्यानंतर पोलीस मित्र असलेल्या इनामदारला त्यांनी या काळ्या धंद्याची आयडिया दिली. आता कोल्हापूर पोलीस इनामदारवर कोणती कारवाई केली जाणार याची उत्सुकता आहे. पोलीस दलातील इनामदारने बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली. या टोळीने इतर राज्यामध्ये बनावट नोटा व्यवहारात आणल्या आहेत का याचा तपास देखील सांगली पोलीस करत आहेत. जर पोलीस दलातीलच कर्मचारी अशा काळ्या धंद्यामध्ये उतरले असतील तर या संदर्भातली माहिती कोल्हापूर पोलिसांना कशी मिळाली नाही हा खरा प्रश्न उपस्थित होतो.