सोलापुरात गाड्या घेण्याच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक
महिंद्रा फायनान्सचे लिलाव अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : कमी दरात कार आणि दुचाकी मिळवून देतो असे सांगत सोलापुरातील तब्बल १५ ते २० नागरिकांची तब्बल ३० लाख ३९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना फेब्रुवारी ते जून २०२५ या कालावधीत साई मोटर्स गैरेज, एमजी शोरूमसमोर, बाळे-पुणे रोड येथे घडली.
याप्रकरणी आयुब अब्दुल शेख (वय ३७, रा. हिरज, उत्तर सोलापूर) यांनी निलेश्वर मनोजकुमार शोधे (रा. अहिल्या एन्क्लेव्ह, इंदौर, मध्यप्रदेश) आणि विजय प्रताप राशंकर (रा. शांती कॉलनी, महुगाव, इंदौर, मध्यप्रदेश) या दोघांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला महिंद्रा फायनान्सचे वाहन लिलाव अधिकारी म्हणून सादर करत, कमी किमतीत कार व दुचाकी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सोमनाथ अशोक तळवळकर याला ‘आवरा’ कार (एम.एच.०२ एफएक्स २४०२) दाखवून २ लाख रुपये घेतले. तर गॅरेजमधील वॉशिंग कामगार शिवाजी देविदास सदगर याच्याकडून ‘ईरटीका’ कार (एम.एच.१७ सीएक्स २५८६) दाखवून ३ लाख रुपये घेतले.
याचबरोबर, गॅरेज शेजारील मन्नान इब्राहिम इनामदार याला ‘क्रेटा’ कार (एम.एच.१४ केएन ९१११) दाखवून ती फक्त ३ लाख रुपयांना मिळेल असे सांगत २ लाख ७५ हजार रुपये उकळले. अशा प्रकारे विविध नागरिकांकडून गाड्यांचे फोटो दाखवून सुमारे ३१ लाख रुपये गोळा करण्यात आले. मात्र, कोणालाही गाडी मिळाली नाही.
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.
> नागरिकांनी अशा प्रकारच्या “कमी दरात गाडी मिळवून देतो” या आमिषाला बळी पडू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.