सर्वोच्च न्यायालयात खळबळ! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकिलाचा बूट फेकण्याचा प्रयत्न
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सुनावणीदरम्यान हा वकील सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेला आणि बूट काढू लागला. तो बूट फेकणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून न्यायालयाबाहेर नेले. त्यावेळी “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देत तो संताप व्यक्त करत होता.
अलीकडेच सरन्यायाधीश गवई यांनी “तुमची तक्रार असेल तर भगवान विष्णूकडे जा” अशी टिप्पणी विष्णू मंदिर प्रकरणी केली होती. या वक्तव्यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. आजचा प्रकार त्याच पार्श्वभूमीवर घडल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी कार्यवाही स्थगित केली नाही. ते म्हणाले, “अशा गोष्टींनी मी विचलित होत नाही. न्यायालयाचं काम सुरू ठेवा.”
सदर वकील पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.