कार्डिलिया क्रूझ प्रकरणी आता तब्बल चार वर्षांनी मोठी अपडेट; नशेखोर न्यायाधीश इरफान शेख थेट बडतर्फ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कार्डिलिया क्रूझ प्रकरणी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान कार्डिलिया क्रूझमधून प्रवास करत असताना संबंधित क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खानच्या मित्रांकडे ड्रग्ज आढळल्याचा कथित दावा करण्यात आला होता. या प्रकरणी एनसीबीच्या पथकाने आर्यन खान याच्यासह इतरांना अटक केली होती. जवळपास दोन आठवडे आर्यन खान जेलमध्ये होता. शाहरुख खानच्या मुलाचं नाव या प्रकरणात आल्यानंतर हे प्रकरण हाय प्रोफाईल बनलं होतं. संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे गेलं होतं. या प्रकरणात आर्यन खानला काही दिवसांनी जामीन मिळाला होता. पण आता याच प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी २ सप्टेंबरला कारवाई झाली होती. तर ७ सप्टेंबरला न्यायाधीशावर कारवाई करण्यात आली होती. यावरुन न्यायाधीशांच्या प्रकरणाचा आणि कार्डिलिया क्रूझ प्रकरणाचा संबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच नशेत आढळलेल्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलं आहे.
संबंधित प्रकरण हे २०२१ चं आहे. पोलिसांनी या प्रकरणात ड्रग्ज जप्त करुन ज्या न्यायाधीशांकडे ठेवलं होतं त्यानीच ते सेवन केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. न्यायाधीशांनी अंमली पदार्थ सेवन केलं असल्याने त्यांना अटक का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच हे प्रकरण कार्डिलिया क्रूझ प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे.
आर्यन खानला एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अटक केली त्यावेळी न्यायाधीश इरफान शेख हे देखील नशेत आढळले होते. मात्र समीर वानखेडे यांच्या टीमने न्यायाधीश इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला. पण हे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत.
हे फेक नरेटिव्ह आहे. हे फेक नरेटिव्ह ज्यांनी पसरवलं आहे त्यांच्या विरोधात आम्ही २०२३ मध्ये पोलीस तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडे आधीच लेखी तक्रार केली आहे. ही अब्रू नुकसानीची देखील केस आहे. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप करण्यात आले आहेत. मला तपासाबाबत काही माहिती नाही. मी त्या व्यक्तीला पाहिलेलं देखील नाही. मी त्यावर काहीही कमेंट करु शकत नाही. मुंबई पोलीस तपास करत आहेत”, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली.