आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या पदाधिकार्यांसह २० जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोहगावमधील गाथा लॉन येथे शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री घडली.
आमदार पठारे यांच्या वाहन चालक शकील अजमोद्दीन शेख (रा. लोहगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कार्यक्रमादरम्यान दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यातून वाद वाढताच आरोपींनी आमदार पठारे यांना धक्काबुक्की केली. आमदारांना वाचविण्यासाठी शकील शेख यांनी मध्यस्थी केली असता, टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ल्यादरम्यान शेख यांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांची सोनसाखळी आणि खिशातील एक हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.