खारघर विभाग सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय पुनर्रचनेनंतर सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता करण्यात आले.
या वेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे लोकार्पण झाले. तर पोलीस सहआयुक्त संजय येनपूरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या २३ जुलै २०२५ च्या निर्णयानुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची नवी परिमंडळ रचना करण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ १ वाशी, परिमंडळ २ बेलापूर आणि परिमंडळ ३ पनवेल अशी विभागणी झाली. याच परिमंडळ ३ मध्ये सहायक पोलीस आयुक्त, खारघर विभाग हे नवे पद निर्माण करण्यात आले असून, खारघर, कामोठे, कळंबोली आणि तळोजा ही चार पोलीस ठाण्यांची हद्द या विभागाला देण्यात आली आहे.
विक्रम कदम यांनी १ ऑगस्ट २०२५ रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या कार्यासाठी खारघर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी नागरिकांनी या नव्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त यांनी केले आहे.