तुमचं राजकारण नंतर करा : साेलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याेती वाघमारे यांना सुनावलं
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांसोबतचा व्हायरल फोन कॉल समोर आल्यानंतर टीकेला सामोरे जावे लागलेल्या शिंदे गट शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी आता या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना वेळेवर मदत आणि जेवण पोहोचत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा फोन कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी किंवा टक्केवारीसाठी नव्हता. शेतकरी आणि पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती,” असे वाघमारे म्हणाल्या.
आपल्या संभाषणात त्यांनी केवळ ‘साहेब’ आणि ‘विनंती’ हे नम्र शब्द वापरल्याचे सांगत, राजकारण कोण करत आहे हे जनतेने ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिंधखेड, पाकणी, डारफळ, देवगाव आणि करंजा यांसारख्या पूरग्रस्त भागांमध्ये आपण स्वतः पाच-सहा दिवसांपासून मदतीसाठी फिरत असल्याचे आणि पावसात भिजून कार्यरत असल्याचेही वाघमारे यांनी नमूद केले.
“पूरग्रस्तांचा आवाज बनणे हा गुन्हा असेल, तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.