पीएचडी धारक तरुणाकडून पुण्यातील नामांकित विद्यापीठाची २.५० कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांची हैदराबादमध्ये कारवाई

Spread the love

पीएचडी धारक तरुणाकडून पुण्यातील नामांकित विद्यापीठाची २.५० कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांची हैदराबादमध्ये कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : उच्चशिक्षित असूनही फसवणुकीच्या मार्गावर वळलेल्या एका तरुणाने पुण्यातील कोथरुड परिसरातील नामांकित खासगी विद्यापीठाला तब्बल २.५० कोटी रुपयांना गंडा घातला. पुणे सायबर ब्रांचने हैदराबाद येथे सापळा रचून त्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा परदेशातून पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदवीधारक असून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. सितैया किलारु (३४, रा. विजयवाडा, आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने स्वतःला आयआयटी मुंबईतील प्राध्यापक म्हणून सादर केले. त्याने पुण्यातील एका प्राध्यापकाचा विश्वास संपादन केला. सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन प्रकल्पाचा करार करून देण्याचे आमिष दाखवत वारंवार ईमेल व दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यानंतर खासगी विद्यापीठाकडून टप्प्याटप्याने तब्बल २ कोटी ४६ लाख रुपये स्वीकारले. मात्र करारासाठी उपस्थित न राहिल्याने फसवणूक झाल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तपासात आरोपीची खरी ओळख समोर आली. मूळचा विजयवाडा येथील असलेला सितैया किलारु हा २०१० मध्ये ईएनटीसी अभियांत्रिकी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेला होता. स्टॅफोर्डशायर व बर्मिंगहॅम विद्यापीठ येथे त्याने अनुक्रमे पदव्युत्तर आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर हैदराबादमधील दोन विद्यापीठांत नोकरी केली. याशिवाय २०१९ व २०२० मध्ये यूपीएससी च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन तो मुलाखतीपर्यंत पोहोचला होता.

सायबर पोलिसांचे पथक १८ सप्टेंबरला हैदराबादला रवाना झाले. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर २१ सप्टेंबर रोजी याप्रल भागात सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून त्याला पुण्यात आणण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आरोपीकडून ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात दहा बँकांचे एटीएम कार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, सिमकार्ड, संगणक, मोबाइल, टॅब, दागदागिने, सोने खरेदीच्या पावत्या तसेच ४८ लाख रुपये किमतीच्या दोन कार यांचा समावेश आहे.

आरोपीवर यापूर्वीही हैदराबादमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला ऑनलाइन जुगाराचे व्यसन असून, पुण्यातील विद्यापीठाकडून मिळालेल्या पैशातील सुमारे सव्वाकोटी रुपये त्याने जुगारात गमावल्याचे त्याने कबूल केले आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon