ठाणे सायबर पोलिसांत समर्पित क्रिप्टोकरन्सी तपास युनिटची स्थापना; आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उद्घाटन
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी ठाणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये समर्पित क्रिप्टोकरन्सी तपास युनिट सुरू करण्यात आले आहे.
या युनिटचे उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संयुक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलीस उपायुक्त ईओ पराग मनेरे उपस्थित होते.
क्रिप्टोकरन्सीद्वारे होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा गुन्ह्यांचा वेगाने तपास करण्यासाठी व नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हे विशेष युनिट कार्यरत राहणार आहे. ठाणे पोलिसांचे हे पाऊल सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत महत्त्वाचे ठरणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.