अपहरण प्रकरणाचा थरारक पर्दाफाश! विमानतळ पोलिसांनी तीन वर्षांच्या बालिकेला अवघ्या चार तासांत केले मुक्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विमानतळ पोलीस स्टेशनच्या दक्ष कामगिरीमुळे तीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण प्रकरण अवघ्या चार तासांत उकलले. दि. २३ सप्टेंबर रोजी फिर्यादीने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार विमानतळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपास सुरू केला.
मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज व लोकसहकार्याच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. तांत्रिक तपासाअंती बालिकेला ठाणे जिल्ह्यातील कळवण येथे नेण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली.
आरोपीची ओळख इरफान इस्माईल शेख (वय २०, रा. लोणीकाळभोर, पुणे) अशी झाली. त्याच्यावर भादंवि कलम ३६३, ३६६(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील व पोलीस उपायुक्त गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.