मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या नामफलकावर ‘मुंब्रादेवी’चे तीन भाषेत स्टिकर;प्रवाश्यां मध्ये गोंधळ
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलकावर अज्ञातांनी मुंब्रादेवी नावाचे स्टिकर चिकटवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने स्टिकर काढून टाकले. त्यानंतर परिसरात पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील पारसिक डोंगराच्या माथ्यावर मुंब्रादेवीचे पुरातन मंदिर आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाटाच्या शेवटच्या नामफलकावर मुंब्रादेवी असे स्टिकर चिकटवण्यात आले.मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये मुंब्रादेवी नाव लिहिण्यात आले होते. रात्री उशिरा स्टिकर चिकटवण्यात आल्याचा अंदाज ‘आरपीएफ’ने वर्तवला आहे. रेल्वे स्थानकात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ‘आरपीएफ’ने तातडीने स्टिकर हटवले.
या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात नोंद दाखल करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्टिकर लावणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू आहे. रेल्वे स्थानकात पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.