मराठीसह विविध हिंदी सिनेमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन; वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love

मराठीसह विविध हिंदी सिनेमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन; वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आणि त्या धक्क्यातून कलाकार, तसेच चाहते मंडळीही अजून सावरले नाहीत. यादरम्यान आणखी एका अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त येऊन धडकले आहे. मराठी-हिंदी सिनेविश्वातून गाजलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले. ‘सूर्यवंशी’, ‘सर्कस’, ‘मर्दानी’, ‘सिंबा’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका विशेष चर्चेत आल्या होत्या. हिंदी सिनेमांसह मराठी सिनेविश्वात त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले होते.शुक्रवारी त्यांच्या निधनाचे धक्कादायक वृत्त समोर आले. वयाच्या अवघ्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशिष यांच्या निधनानंतर अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

आशिष यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, राणी मुखर्जी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, आशुतोष राणा, रोहित शेट्टी, जॉन अब्राहम अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. या सर्वांसोबतचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विविध प्रोजेक्टमध्ये त्यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती. आशिष मराठी-हिंदीतील विविध जाहिरातींमध्येही झळकले होते. आशिष यांच्या निधनानंतर अवघ्या सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. आशिष यांच्या निधनाचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. काही रिपोर्टनुसार अशी माहिती दिली जात आहे की, ते गेल्या काही काळापासून आजारी होते आणि शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon